पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा मान राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मिळतो, आषाढी एकादशीची पूजा ही मुख्यमंत्र्याच्या हस्ते केली जाते, आणि कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. पण सध्या महाराष्ट्रात २ उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे, मात्र यावर्षीच्या कार्तिकी यात्रेची पूजा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हस्ते करावी, असे पत्र सकल मराठा मोर्चाने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीला दिले आहे. मात्र कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना पूजेसाठी एन्ट्री न देण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चाने केला आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी वातावरण तापलेले आहे, मराठा आरक्षण आंदोलन महाराष्ट्रभरातून आक्रमक होत असून सकल मराठा समाज बांधव देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात प्रवेश न देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते एकादशीची पूजा करा, आरक्षण न देता कोणत्याही राजकीय नेत्यांनी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना काळे फासू असा इशारा देखील समितीने दिला आहे.
मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा पेच
कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेला एकच उपमुख्यमंत्री येणार असून मागच्या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता त्यामुळे ही पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली होती, पण यावर्षी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायच्या या पेचात मंदिर समिती सापडली आहे.
विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या निर्णयाकडे लक्ष
कार्तिकी एकादशीचा सोहळा २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे, दरवर्षी या कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते होते. कार्तिकी एकादशीची पूजा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता सामान्य शेतकऱ्याच्या हस्ते करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीकडे केली आहे. त्यामुळे आता मंदिर समिती कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :
भाजपने निलेश राणेंची समजूत काढली की त्यांना समज दिली?
उंचीने कमी असाल तर,या कुर्तींचा नक्की वापर करा, लूक छान दिसेल!