नांदेडच्या शासकीय रुग्णालयात चोवीस तासात २४ रुग्णाच्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या मृत्यूच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आता रुग्णालयात चौकशी करणार आहे. ही घटना समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून (Sharad Pawar) ते काँग्रेस नेते राहुल गांधीनी (Rahul Gandhi) सरकारवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने २४ निष्पाप अमूल्य जीवाची हत्या केली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत, एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने २४ निष्पाप अमूल्य जीवाची हत्या केली. २४ जिवामध्ये १२ नवजात बाळाचा समावेश आहे हे ऐकून मी आणि माझी पत्नी निशब्द झालो आहे. अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. या घटनेवर राजकीय नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. औषधांअभावी १२ बालकांसह २४ जणांचा मृत्यू होणं दु:खद आहे. भाजप सरकार हजारो कोटी रुपये आपल्या प्रचारावर खर्च करत आहे. पण मुलांच्या औषधासाठी पैसे नाहीत, नांदेड घटनेवर शोक व्यक्त करत राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेंच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला गांभीर्याने न घेतल्यानेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली. यातून सरकारी यंत्रणांचे अपयश स्पष्ट होते. किमान वेळीच या दुर्दैवी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आणि निष्पाप रुग्णांचा जीव वाचला जाईल यासाठी ठोस पावले उचलली जावीत याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
दसरा मेळावा कोणाचा? महानगर पालिका आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम
मुंबईच्या Shivaji Park मधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये आढळली मगर