राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभा झाल्या.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्लाबोल केला, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्तर देत प्रियंका गांधी म्हणाल्या की, “बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षाची विचारधार वेगळी आहे पण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाला नितांत आदर आहे, असे स्पष्ट सांगून शिवसेना वा काँग्रेसचा कोणताही नेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापी सहन करणार नाही असे बजावले. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे असे आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी खुल्या व्यासपीठावरून जातनिहाय जनगणना करणार व ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार ही घोषणा करुन दाखवावी,” असे प्रतिआव्हानही प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवणमधील महाराजांचा पुतळा तर अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. भाजपा सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, शिवरायांचा हा अपमान कदापी सहन केला जाणार नाही,” असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितले.
“राहुल गांधी आरक्षण विरोधी असल्याच्या आरोपाचा समाचार घेत प्रियंका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमिटरची पदयात्रा काढून आजही संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत, त्यांच्यावर मोदी शाह हे संतांच्या भूमीतून खोटे आरोप लावत आहेत. भाजपा, मोदी व शाह हे राहुल गांधी यांना घाबरले आहेत,” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…