Rahul Gandhi LIVE: राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच, आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ मुंबईतील बीकेसी येथे पार पडत आहे. यावेळी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थितांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतील बीकेसी मैदानातून फुटला आहे. यावेळी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत राहुल गांधींनी भाजपसह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी यावेळी म्हणाले, “हा लढा विचारधारेचा आहे. लपून-छपून आरएसएसकडून टीका करणं सुरु आहे. ते लपून संविधानाबद्दल बोलत आहेत. समोरा-समोर बोलता येणार नाही कारण; त्यांना त्याचे परिणाम माहिती आहेत. एकीकडे भाजप संघ तर दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. मोदी सरकार निवडणूक आयोगावर दबाव आणते आणि CBI, ED, IT चा वापर करून सरकार पाडते. आधीचे महाराष्ट्र सरकार तुमचे सरकार होते, पण मोदीजींनी ते सरकार चोरून काढून टाकले. संविधानाला कोणीही संपवू शकणार नाही. आम्ही ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडणार. संविधान म्हणजे महापुरुषांचे विचार आहेत.”
“भारतात संस्था, नोकरशाही, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आहे. पण आपल्या जनतेने भारतातील प्रत्येक संस्थानात एकच पक्ष आणि एक विचारधारा लादायची आहे, असे राज्यघटनेत कुठेही लिहिलेले नाही. आज देशातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची यादी पाहिली तर त्यात कोणतीही गुणवत्ता दिसत नाही. कारण पात्रता फक्त RRS चे सदस्यत्व आहे. कुलगुरू व्हायचे असेल तर आरआरएसचे सदस्यत्व घ्यावे लागेल.”
यावेळी मविआकडून विधानसभेसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली. यामध्ये युवकांना प्रतिमहिना चार हजार रुपये, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार, मुली-महिलांसाठी बस सेवा मोफत, शेतकऱ्यांना दिड लाखांपर्यंत कर्जमाफी, कुटुंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत विमा अश्या पाच प्रमुख योजना राबवण्याचे आश्वासन या पंचसूत्रीमध्ये जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीचे पाच हमीपत्र
- महालक्ष्मी
महिलांना दरमहा ३ हजार रुपये
महिलांसाठी मोफत बससेवा
- समानतेची हामी
जात जनगणना होईल
५०% आरक्षणाची मर्यादा काढून टाकणार
- कुटुंब रक्षण
२५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा
मोफत औषध
- कृषी समृद्धी
शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे
नियमित कर्ज परतफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन
- युवकांना शब्द
बेरोजगारांना दरमहा ४ हजार रुपयांची मदत.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर