येत्या २० नोव्हेंबराला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबराला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आयोजित करण्यात येत आहेत. त्यात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतायेत. अशातच आज दि. १८ नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ शेवटची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांचा उल्लेख केला. त्यात विरोधकांवर टीका टिप्पणी केली.
राज ठाकरे आजच्या सभेत म्हणाले की, मी मशिदींवरील भोंगे उतरवले. भोंगे उतरवले नाहीतर आम्ही हनुमान चालीसा लावणार होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या सरकारने आमच्या १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः मशिदींवरील भोंगे उतरवा असं म्हटलं होत. बाळासाहेबांनंतर ते राज ठाकरेंनी केलं. मग यामध्ये उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? असा हल्लाबोल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला.
पुढे राज ठाकरे बोलताना उदाहरण देतात की, एका बाईला तीन मुलं असतात. पाहिल्या मुलाचं लग्न होत. त्यावेळी सासू आणि सुनेचं भांडण होतं आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडणं झाली. भांडखोर सून होती म्हणून सासूसोबत भांडून घर सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचं लग्न होतं. दुसरी सून घरी येते. यावेळी दुसऱ्या सुनेचं देखील सासूसोबत भांडण होतं. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगापण बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळतं की तीन सुनांमध्ये प्रॉब्लेम नव्हता तर सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. ती सासू म्हणजे उद्धव ठाकरे, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेची सासू बसली हे ना तिचा प्रॉब्लेम आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा नाही. या लोकांनी तुमचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात २०१९ पासून जे घडले ते विसरू नका. या सगळ्याला कारण फक्त एक माणूस आहे आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे. सोडून गेलेले गद्दार नाही तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले. त्यानंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे. गेल्या ५ वर्षात काय केले या सगळ्याची उजळणी करा, सर्व आठवा आणि मग २० तारखेला बाळा नांदगावकरांना मतदान करा. मनसेचे राज्यातील जे उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
हे ही वाचा:
विरोधक प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत वारीस पठाण यांना अश्रू अनावर
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.