Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा १९ वा वर्धापन दिन आज राज्यभरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने चिंचवडमधील रामकृष्ण सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज ठाकरे म्हणाले की, २० दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा होणार आहे. तिकडेच जर मी दांडपट्टा फिरवणार असेन तर आता मी चाकू, सुरे कशाला काढू? आज मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. महाराष्ट्राचा जो काही चिखल झालेला आहे. तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकं फोडून घेत आहेत. हे आमच्या लोकांना समजत नाही आहे.
तर पुढे, महाकुंभनिमित्त आणि गंगेच्या प्रदूषणाबाबत राज ठाकरे यांनी म्हटलं की, “काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाची बैठक लावली होती. त्यात काहीजण हजर नव्हते. गैरहजेरीबद्दल मी प्रत्येकाला विचारलं. अनेकांनी नेहमीची कारणं सांगितली. पाच-सहा जणांनी सांगितलं महाकुंभला गेलो होते. बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले होते. मी म्हटलं मी नाही पिणार हे पाणी. महाकुंभचे मी व्हिडीओ पाहिलेत. त्यात दिसतंय माणसं, बायका घासून पुसून अंघोळ करत आहेत आणि बाळा नांदगावकर म्हणतायेत पाणी प्या. कोण पिणार हे पाणी.” असे राज ठाकरे भाषणात म्हणाले.
“आताच कोरोना गेला. दोन वर्ष फडकी लावून फिरले आता तिथे जाऊन अंघोळ करतायेत. कोण जाऊन त्या गंगेत अंघोळ करेल आणि पाणी पिणार. श्रद्धेला पण काही अर्थ आहे का? देशात एक नदी स्वच्छ नाही राहिली आणि आम्ही नदीला माता म्हणतो. परदेशात लोक माता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आहेत. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार.मात्र गंगा काही साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या अंधश्रद्धेतून बाहेर या”, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी उपस्थितांना केल.
Follow Us