विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. तर महाविकास आघाडी आणि मनसेला मोठा धक्का बसला होता. निवडणुकीनंतर त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. आज मुंबईत राज ठाकरेंनी मेळावा घेतला यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पडखर भाष्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर त्यावर मोजकी प्रतिक्रिया व्यक्त करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पहिल्यांदाच या मुदयावरून स्पष्ट बोलले. विधानसभेचा निकाल न पटल्याचे सांगत त्यांनी त्यावर स्पष्टपणे मत मांडलं. ” महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला ? भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो, पण अजित पवार ४२ जागा ? ४ ते ५ जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना ४२ जागा ? आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केल त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? ” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वरळी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
‘बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला भेटताय मी तुम्हाला भेटतोय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची मी प्रतिक्रिया दिली होती त्याच्यात मी काय बोललो नव्हतो. पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असा नाही. सर्व गोष्टींचा विवेचन सुरू होतं आकलन सुरू होतं. बरीच लोक मला भेटली. गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेक लोक भेटायला आली. निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशी मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता ज्या प्रकारचा मिरवणुका जल्लोष पाहिजे होता त्या जागी फक्त राज्यभरात सन्नाटा पसरला होता. हे काय झालं कसं झालं असा कसा निर्णय आला, माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही.त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर बोलले मला म्हणाले इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकला असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसलं उदाहरण आहे. काही काही गोष्टींवरती विश्वासच बसू शकत नाही, असा पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
लोकसभेला काँग्रेसचे 13 खासदार जिंकले त्या खासदारांच्या खाली ४ ते ५ आमदार असतात त्यांचे १५ आमदार आले ? शरद पवार यांचे ८ खासदार आहेत त्यांचे इतके कमी आमदार ? चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे, असे राज ठाकरे म्हणाले. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलय फक्त ते आपल्यापर्यंत आलेल नाही हे लक्षात घ्या. अश्या प्रकारच्या जर निवडणूका होत असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्वेग व्यक्त केला.
हे ही वाचा :