खरं तर या विषयाला तोंड फुटलं ते कराडच्या प्रीती संगम घाटावरून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी. प्रीती संगमावर काल २५ नोव्हेंबरला अनेक राजकीय नेत्यांची रेलचेल पाहायला मिळाली. त्यातच अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांना क्रॉस होणार तेवढ्यातच एक गोष्ट घडली. अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांच्या समोर आले तेवढ्यात अजित पवारांनी आपल्या हटक्या स्टाईल मध्ये दर्शन घे काकाचं म्हणत रोहित पवारांना पाय पडायला लावलं. अरे ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, बेस्ट ऑफ लक असं म्हणत जाता जाता पुतण्याला चिमटा देखील ते काढून गेले. सीन संपला पण या एका प्रसंगामुळे अनेकांच्या डोक्याला शॉट झाला. रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले भाजप उमेदवार राम शिंदे यांनी तर मी नियोजित गटाचा बळी पडलो असं म्हणत रोहित पवार आणि अजित पवार आतून एकच असल्याचंही डायरेक्टली सांगून टाकलं. राम शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता किंबहुना कर्जत जामखेड संदर्भात करार झाला होता. माझ्या विरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलोय, मला आज त्याचा प्रत्यय आला, मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्या संदर्भात वरिष्ठांकडे आणि अजित पवारांकडे मागणी करत होतो परंतु अजित पवारांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की, मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला. या सगळ्या राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो होतो. थोडक्यात अजित पवारांनी जामखेडमध्ये सभा घेतली असती तर निकाल वेगळा लागला असता. मात्र अजित पवारांनी जाणून बुजून कर्जत जामखेडला सभा घेतली नाही आणि रोहित पवारांचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचा राम शिंदे यांचा आरोप आहे.
थोडक्यात काय राम शिंदे यांना हे सांगायचं होतं की, कर्जत जामखेड मधल्या भाजपच्या पराभवामध्ये अजित पवार यांचाही तितकाच हात आहे. खरं तर महाराष्ट्रात ज्या काही अटीतटीच्या लढती होत्या त्यात जामखेडचाही समावेश होता. अगदी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत दोघेही उमेदवार काठावर होते. मधल्या काळात रोहित पवार पराभूत झाल्याच्या अपडेट्स ही व्हायरल झाल्या पण अखेर फायनल रिझल्ट लागला आणि रोहित पवारांचा अवघ्या १२४३ इतक्या निसटत्या लीडने विजय झाला आणि राम शिंदे यांच्या आमदारकीच्या स्वप्नाचा पुन्हा एकदा चकणाचूर झाला. गेल्या वेळेस शिंदे यांचा तब्बल ४३ हजारांनी दारुण पराभव झाला होता. राम शिंदे यांनी २०१९ मध्ये आपल्या पराभवाचं खापर सुजय विखे पाटलांवर फोडलं होतं. यावेळेस आता तेच खापर ते अजित पवारांवर फोडू पाहत आहेत.
तर रोहित पवारांनी बाराशे मतांनी का होईना पण कर्जत जामखेड मध्ये बाजी मारल्याचं दिसतंय. आता अजित पवारांची सभा झाली नाही म्हणून आपला पराभव झाला किंवा पवार कुटुंबात झालेल्या करारामुळे आपला राजकीय बळी गेला असा आरोप शिंदेनी करण्यामागचं कारण काय असू शकतं, तर कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांची चांगली ताकद आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना निवडून आणण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होता त्यामुळे यावेळी इथे अजित पवारांची ताकद राम शिंदे यांच्या मागे उभी राहिली असती तर रोहित पवारांना पराभवाचा सामनाही करावा लागला असता, याचीच कल्पना अजित पवारांना असल्यानं त्यांनी सभा घेतली नाही असा राम शिंदे यांचा रोख असल्याचं दिसून येतंय. आता पवार कुटुंबात कर्जत जामखेड बाबत करार झाल्याचा राम शिंदेने आरोप करण्याचं कारण म्हणजे रोहित पवार हे अजित पवार पवारांचे पुतणे त्यांनी बारामतीच्या स्थानिक राजकारणातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. त्यामुळे शरद पवारांसोबतच त्यांना अजित पवारांचेही राजकीय मार्गदर्शन मिळालंय. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे पवार कुटुंबातले दोन नेते शरद पवार गटात राजकीय ऍक्टिव्ह आहेत. पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीतलं नाव म्हणून सध्या रोहित पवारांकडेच पाहिलं जातं. आता पार्थ पवार यांचा गेल्या लोकसभेला पराभव झालाय, त्यात यावेळी योगेंद्र पवार ही पराभूत होतील याची अजित पवारांना चाहूल असू शांत होती, त्यामुळे जर रोहित पवारांच्या विरोधात अजित पवारांनी ताकद लावली असती तर पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीतील उगवत्या नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला असता. त्यामुळे पवारांच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं याचसाठी राम शिंदे हे पवार कुटुंबात करार झाल्याचा आरोप करत असावेत असं बोललं जातंय.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियन भूमीत Australia संघावर मात करणाऱ्या Team India चे CM Shinde यांच्याकडून कौतुक
Naresh Mhaske , त्यांची जी अवस्था आहे ते संजय राऊतांमुळे…