राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
https://youtu.be/nkBMsA5IvAY?si=lnfGFc0g9P_SopFE
“काँग्रेस अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले व वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्षच करत आहे,” असे सडेतोड उत्तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहे.
रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, “राहुल गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली व जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आरोपाचा तीव्र निषेधही करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जनता मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. नरेंद्र मोदी रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत होते. याउलट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.”
“भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा व कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला ७००० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ” असेही रमेश चेन्नीथला यांनी जाहिर केले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत डाव्या विचार सरणीचे लोक होते या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, “भारत जोडो यात्रा हे एक मोठे जनआंदोलन होते. यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. या यात्रेतून राहुल गांधी यांनी देशातील गरीब, आदिवासी, दलित, वंचित, शेतकरी, महिला, तरुण वर्गांच्या समस्या व वेदना जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रेला जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे भाजपा धास्ती बसली आहे त्यातून असे खोटे आरोप केले आहेत,” असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.
हे ही वाचा:
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…