शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ११ जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणूक स्वबळावर लढवणार अशी घोषणा केली. लगेच या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “त्यांच्यामध्ये काय चाललं आहे हे जसं तुम्हाला कळत नाही, तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही”, असे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले.
उदय सामंतांनी ठाकरे गट योग्य वळणावर येतोय का ? या प्रश्नावर उत्तर दिले की, “योग्य वळणावर येतोय का, हे त्यांनाच माहित. काही गोष्टींची त्यांना जाणीव झाली असेल म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील”, अपेक्षित यश मिळेल का? १५ वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही असे उत्तर उदय सामंत यांनी दिले. पक्ष टिकवायचा असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल तर त्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. त्यालाच त्यांचं प्राधान्य असेल. हे प्रयोग केले नाहीत, तर ते राजकारणात टिकणार कसे? असे उदय सामंत म्हणाले.
पुढे ते म्हणले की, “२०१९ ला जन्मताच कौल मिळालेला असताना काँग्रेससोबत जाणं. त्यानंतर काँग्रेसच्या हाताचं प्रचार करणं. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही. त्या काँग्रेसचा प्रचार केला. भाषणात हिंदुहृदय सम्राट शब्द न वापरणं, याचे सगळ्याचे फटके बसले असतील, म्हणून कदाचित हा निर्णय घेतला असेल.”