रत्नागिरी येथे आज १५ फेब्रुवारी रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यासाठी एसटीच्या बसेस बुक केल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचा आरोप देखील राऊत यांनी केलाय. त्याला उदय सामंत यांनी देखील प्रतिउत्तर दिलंय. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी एसटी बसेस बुक करताना दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेतली गेलेली आहे. असं उत्तर उदय सामंत यांनी विनायक राऊत यांच्या टीकेला दिलेले आहे. तसेच उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, या विनायक राऊत यांच्या टीकेला उदय सामंत यांनी राऊत जेवढे माझ्यावर बोलतील, तेवढं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील लोक माझ्याकडे येतील असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हल्लाबोल केलाय.
महायुती (Mahayuti) म्हणून निवडणूक लढवायची अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी सांगावं लागत आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ आहेत, अशा व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव आहे भास्कर जाधव यांचं नाही, असे वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना केले.
शिंदेंना हलक्यात घेऊ नका
देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन वेगळा स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा ठाकरेंच्या बाबतीत हा उल्लेख केला आहे. त्याचा कुठेही भाजप किंवा मित्रपक्षांशी संबंध नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. मी माझ्या आयुष्यात कोणाचाही अनादर करणारं वक्तव्य केलं असेल तर राजकीय संन्यास घेईन. मी देखील नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार आहे. गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर त्यात कटशहाच राजकारण नाही. त्यांना केवळ ठाण्यात नाही तर राज्यात कोणी शह देऊ शकत नाही. भाजपमधील नेत्याबद्दल मी वैयक्तिकरित्या बोलणे चांगलं नाही. पराभवानंतर अनेक नेत्यांनी आपलं काय चुकलं याचे आत्मचिंतन केले आहे. लोक का जात आहेत याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटले आहेत. त्यावर आक्षेप कसा घ्यायचा, त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन आहे याची कल्पना असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.