मराठा आरक्षणाच्या विषयावर आज सह्याद्री अतिथिगृह येथे सर्व पक्षांची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. या बैठकीला शरद पवार, अंबादास दानवे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, संभाजी राजे छत्रपती यांच्यासह सर्व पक्षांचे नेते हजर राहणार आहेत. राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंना या बैठकीसाठी बोलवण्यात आले नाही. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून सर्व पक्षांच्या बैठकीला ऐऱ्या-गैऱ्या पक्षांना निमंत्रण दिलं जातं मात्र, उद्धव ठाकरेंना बोलावण्यात येत नाही, त्यावरून संकुचित मनोवृत्ती दिसते, अशी टिका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर संजय राऊत यांच्या आरोपांवर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंभूराज देसाईंचा दावा फेटाळला आहे. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना बैठक बोलवण्याचा अधिकार नाही, ३१ डिसेंबर नंतर मुख्यमंत्री शिंदे घरी बसणार आहेत. मनोज जरांगेच्या उपोषणावर मार्ग निघणे गरजेचे आहे. संकुचित मनोवृत्तीतून मार्ग निघणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या-गैऱ्यांना निमंत्रण दिलं मात्र, उद्धव ठाकरे यांना बोलावलं नाही, त्यातून त्यांची संकुचित मनोवृत्ती दिसते. अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावलं आहे. उद्धव ठाकरेंची भीती असल्याने एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना बोलावलं नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मस्तर, घृणा आणि अहंकाराने भरलेल्या सरकारने बुद्धी गहाण ठेवल्याचा अनुभव येत आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र पेटला असताना सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली परंतु त्या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना पक्षाला बोलावले नाही हे कशाचे द्योतक आहे? हा निर्लज्जपणाचा कळस आहे. बेगुमान आणि बेमुवर्तपणे सरकार चालवणारे, जनतेच्या प्रश्नाचं गांभीर्य नसलेलं त्यांच्या भावनांबद्दल कळकळ नसलेलं हे घटनाबाह्य सरकार आज ना उद्या जाईलच पण काळच त्यांच्यावर सूड उगवेल. महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध! अशा शब्दात अरविंद सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे.
हे ही वाचा :
WESTERN RAILWAY: ओव्हरहेड वायर तुटली, दुरुस्ती होऊनही गाड्या उशिराने