काळ संध्याकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा पार पडला. त्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. राज्याला पुन्हा दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. काल पर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार कि नाही यावर सस्पेन्स कायम होता. कारण मुख्यमंत्री पद गेलं पण गृहखातं तरी आपल्याला मिळावं याच्यासाठी ते आग्रही होते. बराच काळ नाट्यमय घडामोडी घडत होत्या. मात्र अखेर काल शपथविधी सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता याच शपथविधी सोहळ्यावरून आणि उपमुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, त्याशिवाय मी बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. सरकारमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये आमचे हितचिंक असतात. त्यांच्या पक्षातसुद्धा, गटातसुद्धा हितचिंतक आहेत असेही राऊत म्हणाले. दाबदबावाचा अडेलतट्टूपणा असाच कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं, असा दावाही राऊत यांनी केला.
पुढे ते बोलले, सत्तेचं रक्त लागल्यामुळे काहींना शिकार सोडावीशी वाटत नाही असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. बहुमत गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला होता, पण ठाकरेंप्रमाणे वागायला काहींना जमत नसल्याने आदळआपट करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं. तोंडाला रक्त लागलं वर्षा बंगल्याचं, सत्तेचं की त्यांना ती शिकार सोडावीशी वाटत नाही. मा. उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावल्यानंतर त्यांना पदाला चिटकून राहणं योग्य वाटल नाही, तेव्हा त्यांनी तत्काळ राजीनाम देत वर्षा बंगला सोडला. त्यांना मोह नाही, पद मिळालं काम केलं. पद गेलं तर सत्ता सोडली आणि निघून गेले. पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमलं त्यांनी केली, ज्यांना जमलं नाही ते आदळआपट करत राहिले, अशी शब्दांत राऊतांनी शिंदेवर निशाणा साधत टीका केली.
हे ही वाचा:
११ डिसेंबरला आमदारांचा होणार शपथविधी; कुणाच्या वाट्याला कोणते मंत्रिपद?