राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
अमित शहा यांनी एका भाषणात शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, “राहुल गांधी यांना वीर सावरकरांसाठी काही शब्द बोलायला सांगू शकतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणताही नेता दोन वाक्य बोलू शकतो का?” असा सवाल विचारला होता. यावरून संजय राऊत यांनी आज (सोमवार, ११ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद सदफहात चांगलीच आगपाखड केली आहे.
संजय राऊत यावेळी म्हणाले, “बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंच पुढे सरकत नाही. तुमच्या पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोक हे अधिक चांगली आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे. तुमच्यासारखं त्यांचं प्रेम ढोंगी नाही. तुम्ही तुमच्या पोस्टर वरच्या व बॅनर वरचे बाळासाहेबांचे फोटो काढा लोक तुम्हाला महाराष्ट्रात उभा करणार नाही. आम्ही सातत्याने सांगत आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या. का देत नाही आहात? त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “अमित शहा खोटं बोलत आहे. व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी… ३७० कलम हटवून कश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले? आजही कश्मीरमध्ये आपल्या जवानांच्या हत्या सुरू आहेत. ३७० कलम हटवल्यामुळे ना कश्मीरचा, ना देशाचा फायदा झाला.. कश्मीरमध्ये एकही रोजगार आला नाही. फक्त गौतम अडाणीसाठी जमिनी मोकळ्या केल्या. महाराष्ट्रात चिखल जो केला आहे त्याला जबाबदार अमित शहा आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “या राज्याचा मुख्यमंत्री अमित शहा नाही ठरवू शकत, ही या राज्याची जनता ठरवेल. अमित शहांनी ४० आमदार विकत घेतले असतील, अमित शहांनी महाराष्ट्राची जनता विकत घेतलेली नाही. अमित शहा हे महाराष्ट्राचे नेते नाहीत व ते गुजरातचेही नेते नाहीत, अमित शहा देशाचे नेते कधीच होऊ शकणार नाही. जोपर्यंत त्यांच्या हातात पोलीस, सीबीआय, ईडी आहे, तोपर्यंत ते या देशात आणि राज्यात दहशत निर्माण करू शकतात,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…