राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच आज (रविवार, १७ नोव्हेंबर) शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
शिवसेना शिंदे गटातर्फे वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसारित करण्यात आली असून त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत असून ‘मी शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही,’ असा आशय लिहिला आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर चांगलीच आगपाखड केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत, “एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांबद्दल? त्यांनी कधी टेंभी नाकापलीकडे जग पाहिले नाही,” असा खोचक टोला लगावत, “हे आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे शिकवणार का?’ असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
यावर भाष्य करत संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब असेही बोलले होते. मी दिल्लीची लाचारी करणार नाही आणि दिल्लीचे बूट चाटणार नाही आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवीन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक दिल्लीचे बूट चाटतात दिल्लीचे मुजरेगिरी करत आहेत हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधी पासून राजीव गांधी पर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र आज बॅरिस्टर अंतुले वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील किंबहुना शरद पवार असतील या सगळ्या काँग्रेस नेत्यांबरोबर बाळासाहेबांनी आपल्या जिव्हाळ्याचे संबंध ठेवले महाराष्ट्रामध्ये एकोपा राहील कायम त्यांनी एक काळजी घेतली. एकनाथ शिंदे यांना काय माहिती बाळासाहेबांबद्दल त्यांनी कधी टेंभी नाका पलीकडे जग पाहिले नाही हे आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का?” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…