विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे सर्वत्र ठाकरे गटात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनतर महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी त्याला उत्तर दिले नाही. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. परंतु ते या विषयावर गप्प आहेत. या प्रकरणात शरद पवार आपली जबाबदारी नाकारू शकत नाही. तेसुद्धा याला जबाबदार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, ” शरद पवार यांनी पुढाकार घेतला की नाही हे मला माहित नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखल फेक झाली आहे. त्याची जबाबदारी शरद पवार सुद्धा झिडकारू शकत नाही. संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर हेही जबाबदार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष तारा भवळकर यांनी सुद्धा याच्यावरती शरद पवार यांनी देखील निषेध व्यक्त केला पाहिजे. ते गप्प कसे राहू शकतात, तुमच्यावर जेव्हा चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो. ही कोण बाई आहे नीलम गोऱ्हे कुठलं भूत आहे. राजकारण झालं हे साहित्य संमेलन नव्हतं, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी साहित्य महामंडळावर आरोप केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन घडवले का? साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवत आहे. सरकारने दोन कोटी दिले तर २५ लाख खंडणी म्हणून काढून घेण्याचे काम साहित्य महामंडळ करत आहे. कार्यक्रम ठरवताना महामंडळ आणि आयोजक सतरंजी उचलण्याचे काम करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.