महायुती सरकार राज्यात स्थापन झाले असून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. तथापि, शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदावर शपथ घेणार का, यावर चर्चा सुरू होती. अखेर, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. पण आता, गृह खाते शिवसेनेस देण्यात येईल का, की ते देवेंद्र फडणवीस यांनीच राखून ठेवणार, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यामध्ये गृहमंत्री पदावरून तणाव निर्माण झाला आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी तीन पर्याय देण्यात आले आहेत. शिवसेनेला या तीन खात्यांमधून एक निवडावे लागणार आहे, पण गृह खात्याच्या तोडीस तोड असलेले खातं मिळवण्यासाठी शिवसेना दबाव टाकत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालयाच्या बदल्यात महसूल, जलसंपदा, आणि सार्वजनिक बांधकाम या तीन खात्यांचा पर्याय देण्यात आले आहेत. शिवसेनेला या तीनपैकी एक खाते निवडावे लागेल. मात्र, गृह खात्याइतके महत्त्वपूर्ण आणि तोडीस तोड असलेले खाते मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. ऊर्जा आणि गृहनिर्माण खात्यांचा पर्याय शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे, वरील तीन पर्यायांमधून एक खाते शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकते, आणि त्यात महसूल खाते हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. गत महायुती सरकारमध्ये महसूल खाते भाजपकडे होतं, ज्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांभाळली होती. सार्वजनिक बांधकाम खातेही भाजपकडेच होतं. मात्र, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी वावरणारे एकनाथ शिंदे गृह खात्याचा आग्रह धरत आहेत, तर भाजप ते सोडायला तयार नाही.
हे ही वाचा:
११ डिसेंबरला आमदारांचा होणार शपथविधी; कुणाच्या वाट्याला कोणते मंत्रिपद?