सध्या संपूर्ण राज्यात निवडणुकांची रणधुमाळी ही चालू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तुफानी ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यात मतदान हे होणार आहे. तर त्यापुढे पुढील ३ दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी ही होणार आहे. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी चालू असून सभांना आणि प्रचाराला जोरदार सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापूरात दाखल झाले. के पी पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली.
कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सतेज पाटील यांनी आपल्या जवळ बोलावले. सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या जवळ जाताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्यावर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी देखील सोपवली. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये भाषणात महाविकास आघाडीचे सरकार आले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले जाईल. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की, आता त्यांच्याकडून दिशाभूल करणारे वक्तव्ये येत आहेत. ज्या काँग्रेसचा विरोध हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर केला, त्याच काँग्रेसला मांडीवर घेऊन बसले आहेत. या निवडणुकीमध्ये लोकच तुम्हाला घरी बसवणार आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारापासून, बाळासाहेब यांच्या विचारापासून ते कोसो दूर गेले आहेत. शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद आहे, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. कोल्हापूरमध्ये डॉक्टर संघटनेत बैठक झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून होणाऱ्या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. १५०० रुपये मध्ये काय होते असे म्हणतात, जे कधी स्वतः च्या घराबाहेरून निघाली नाहीत त्यांना दुसऱ्याच्या घरात काय सुरु आहे कसे कळणार? अशी टीका त्यांनी केली. ते माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित आहेत. पंधराशे रुपयांमध्ये मुलांची फी देता येते, घरखर्च भागू शकतो, छोटा मोठा उद्योग सुरु करू शकतो, या स्टोरीज आपण दाखवल्या असल्याचे ते म्हणाले. गरिबांसाठी १५०० रुपये महत्त्वाचे आहेत. वचनाम्यात १५०० रुपयांचे पुढील काळात २१०० रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांची देण्याची दानत नाही ते कधीच देऊ शकत नाही, ते फक्त घेण्याचं काम करू शकतात, बंद करण्याचं काम करू शकतात, अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेस Ajit Pawar पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ११ आश्वासनांचा समावेश