शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ईशान्य मुंबईच्या कार्यकर्त्यांचे निर्धार शिबिराचे आयोजन मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अशी निर्धार शिबिर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेतली जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उबाठा मधून होणारे आउटगोइंग रोखण्यासाठी कार्यकर्त्यांच्या घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे. आदित्य ठाकरे या शिबिराचे उद्घाटन करणार आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराची सांगता होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या शिबिरांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत.तर या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला सुद्धा निमंत्रण दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याविषयीची माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. यावरून त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत शिबिराविषयी माहिती देताना म्हणाले की,” गेल्या काही काळात शिवसेनेचं महत्वाचं शिबिर आहे. सकाळपासून शिवसैनिकांना मार्गदर्शन होईल, दिशा मिळेल. आदित्य ठाकरे येतील, उद्घाटन करतील आणि समारोप उद्धव ठाकरे करतील. जळगाव, पुणे, धुळे, कोल्हापूर विविध ठिकाणी आता शिबिर होतील. शिवप्रेमी यांच्या घरापर्यंत पोहण्याचा कार्यक्रम आहे.”
“महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेविषयी दावे करत होते. तर आम्ही ही फसवणूक असल्याचे सांगत होतो. १५०० रुपयांना बहिणींची मतं विकत घेतली आणि २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. बहिणींनी मतं दिली पण आता सरकारकडे देण्यासाठी पैसे नाहीत. हे सरकारच्या खिशातील पैसे नाही तर जनतेच्या करातील पैसे आहेत. जोपर्यंत जनता बंड करत नाही तोपर्यंत अशी फसवणूक सुरूच राहील,” असे संजय राऊत म्हणाले.
Follow Us