spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

असे बेशिस्त अधिकारी यापुढे पूर्णवेळ घरी बसून सोशल मीडिया बघतील; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर प्रत्येक जिल्ह्यात पार पडत आहे. या बैठकांच्या माध्यमातून आमदार, खासदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील व मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावले जातात. तसेच, तालुक्यातील विकासकामांचा आराखडा या बैठकीतून मांडला जातो. त्यामुळे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना अधिक महत्त्व असते. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काही शासकीय कर्मचाऱ्यांना सभेचे गंभीर्यच नसल्याचं पाहायला मिळालं. अनेक अधिकारी सभेदरम्यान मोबाईलवर व सोशल मीडियावर वेळ घालवत असल्याचे दिसून आल्याने सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संताप व्यक्त करत सज्जड दम भरला.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु होती. या सभेला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखारे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र, या सभेला उपस्थित असणारे काही अधिकारी आणि कर्मचारी यांना या सभेचं सोयरं सुतक नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. या बैठकीतील विविध खात्याचे अधिकारी बैठकीदरम्यान चक्क मोबाईल, सोशल मीडियावर व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. तर काही अधिकारी मोबाईलवर संभाषण करत असल्याचेही दिसून आले. जिल्हा नियोजन सभेला अशा पद्धतीने अधिकारी दुर्लक्ष होणार असेल तर नियोजनचा घाट नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट इशारा दिलाय. तसेच, मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर बैठकीत लक्ष देणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्णवेळ घरी बसवेन, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करत मोबाईल व सोशल मीडियावर वेळ घालवला जातो. संबंधित अधिकाऱ्यांची मला माहिती द्या. ते परत सोशल मीडियावर दिसणार नाही याची काळजी मी घेईन, त्यांची अकाऊंट डिलिट होतील हेही कळेल, अशा शब्दात नितेश राणेंनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सज्जड दम दिलाय. आम्ही घरात वेळ नाही म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या सभेत बसत नाही, तर जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ देत आहोत. सोशल मीडियामुळे कोणी वेळ वाया घालवत असतील तर असे बेशिस्त अधिकारी यापुढे पूर्णवेळ घरी बसून सोशल मीडिया बघतील असं नियोजन करू, अशी तंबीच पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून अधिकाऱ्यांना दिली.

हे ही वाचा :

CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss