सध्या चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले. सर्व बनवाबनवी व बोगसगिरी आहे. पीएम किसान योजनेमधूनही लोकांना असेच बाहेर केले, आता फक्त 1 लाख 10 हजार लोकांना तो निधी मिळतो आहे. काही दिवसांनी तो 60 हजारपर्यंत खाली येईल आणि अशी स्थिती लाडकी बहीण योग्य संदर्भात होईल आणि अर्ध्या अधिक महिलांचे नाव वगळले जातील, नवीन अटी शर्ती लावून महिलांची नावे कमी केली जाते. 2100 रुपयांचे वचन ते पूर्ण करू शकणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बदला घेण्यासाठी तयार राहावं आणि मतदानाने या राक्षसांचा नायनाट करावा अशी आम्ही बहिणींना विनंती करतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. याबाबत कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, 2024 मध्ये दावोसमध्ये जे करार झाले होते. त्यांची किंमत होती 3 लाख 53 हजार कोटी, त्यापैकी किती गुंतवणूक खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आली, त्याची माहिती जनतेसमोर ठेवावी. आता सांगतात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. प्रत्यक्ष उद्योगपतींनी या गुंतवणुकी संदर्भात काम सुरू केले, तेव्हाच याबद्दल बोलता येईल, अन्यथा फक्त 2024 सारखी पुनरावृत्ती होऊ नये अशी आम्हाला काळजी आहे. जेव्हा गुजरातची नजर या साडे सहा लाख कोटीवर पडेल तेव्हा अर्धी गुंतवणूक गुजरात कडे घेऊन पळून जातील, असे कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
मविआ आमदार-खासदार महायुतीकडे जाणार या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, उदय सामंत यांना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना की त्यांच्या पदाला धोका निर्माण होऊ नये. मुळात आजकाल असे हास्यास्पद स्टेटमेंट सत्ताधारी पक्षाकडून येऊ लागले आहेत. उदय सामंत यांचे मत भाजपची एकहाती सत्ता बनावी का? असेच आम्हाला त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.
हे ही वाचा :