विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. निवडणुकीपूर्वी राज्यात नाराजीनाट्य पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या काळात तिकीट मिळू शकले नाही त्यामुळे काही नेते नाराज झाले होते. या नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली होती. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपाची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा पार्टीचे वेध लागलेले आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिलेले नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्क मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाची साथ सोडलेले नेते आता भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. हे नेते पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नुकताच कोकणातील एका नेत्याने भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील देखील भाजपमध्ये येण्यास इच्छूक असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पुन्हा भाजपमध्ये पुन्हा येण्यासाठी इच्छूक आहे.
विधानसभा निवडणूक तिकीट मिळणार नाही असे दिसत असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला होता. भाजपाची साथ सोडत काही नेते ठाकरेंच्या शिवसेनेत, काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते. आता पुन्हा ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यासारख्या काही महत्वाच्या नेत्यांनी भाजपाची साथ सोडली होती.
दरम्यान, शिर्डीमध्ये भाजपचे ‘घर चलो अभियान’ सुरु आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमधील इनकमिंगबद्दल सांगितले की, कुठल्याही नेत्यांना प्रवेश घेताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पक्ष प्रवेश केला जाईल. महायुतीत कुठलाही तणाव निर्माण होणार नाही, महायुती महत्वाची आहे. नेतृत्वाला विश्वासात घेऊन पक्षप्रवेश केला जाईल.