राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लबोल हा केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. दोन उपमुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे पण महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकासंदर्भात घटनाबाह्य सरकार जे फटा वाजवते ते फुसके आहेत. ग्रामपंचायत निवडणुक निकालाचे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत हा मूर्खपणा आहे. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाही हे जर घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे. यांनी पंचायती राज समजून घ्यायला हवे पण हे अनाडी घोडे उधळलेले आहेत. जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात त्यांची हातभर फाटते त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत.
तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, जे सरकार,जे राजकीय पक्ष मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. घ्या तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिका सह इतर १४ महापालिकांच्या निवडणुका व जिल्हा परिषद निवडणूका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं ? या महाराष्ट्रामध्ये अडाण्यांचे सरकार आहे यात राज्याची बदनामी होते. ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे, ५० खोके ४० खोके ते आकड्यावरच जगतात. निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेले असताना तुम्ही रडीचा डाव खेळता. या निवडणूका घ्या आणि त्यांच्या निकालावर ठरवा कोण जिंकलं आणि कोण हरलं. एक पक्ष आणि एकदाच निवडणूक अशी त्यांची घोषणा आहे.
तसेच छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलत असताना राऊत पुढे म्हणाले आहेत की, हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे.यामुळे या ठिकाणचे रोजगार, उद्योग हे बाजूच्या राज्यामध्ये जावे यासाठी टाकलेले डाव आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी या डावांमध्ये फसू नये. या राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे. तर पुढे राऊत म्हणाले की, महादेव ॲप मध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ अजित पवार छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲप चे मेंबर आहेत. जेलमध्ये पाठवायचं होतं त्यांची आता पूजा केली जाते. देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यावर फुल टाकतात. गोंदिया मध्ये तुम्ही बघितला असेल प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचे स्वागत केलं. इकबाल मिरची सोबत संबंध असल्याचा आरोप प्रफुल पटेलांवर यांनीच केला होता. आता तेच हातात हात घालून चालत होते हे सगळे महादेव अॅपची कमाल आहे.
हे ही वाचा :
आजचे राशिभविष्य,७ नोव्हेंबर २०२३; तुमच्यापैकी काही जण…
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे होणार अनावरण