RSS Leader Bhaiyyaji Joshi on Mumbai’s Language : मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मुंबईच्या भाषिक वैशिष्ट्यावर बोलत होते. पण बोलताना ते असे काही बोलून गेले की, त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या. भाजप सरकार आल्यापासून मुंबई तोडण्याची भाषा होत आहे, मुंबईतील मराठी माणसांवर अन्याय होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. त्यात भैय्याजींच्या वक्तव्याने फोडणी बसली आहे.
“मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे”, असं वादग्रस्त वक्तव्य जोशी यांनी केलं आहे. त्याचबरोबर “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात”, असंही त्यांनी म्हटलं आहे. विद्याविहार येथील एका नामांतराच्या कार्यक्रमात बोलताना संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. त्यानंतर आज त्याचे पडसाद उमटले. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. भैय्याजी यांच्याविरोधात कारवाईचा मुद्दा लावून धरला.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईची, महाराष्ट्राची ,महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे. माझ्या वक्तव्याशी भैय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठीच आहे. तर, राज्य सरकार हे मराठीविरोधी सरकार आहे. भैय्याजी जोशींकडून महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. जशी तमिळनाडूची तामिळ आहे. असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा भाव समजून घ्या असे आमदार राम कदम म्हणाले. तर जोशींचे कृत्य हे औरंगजेबापेक्षा भयंकर आहे, जोशी यांचं वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का? त्यांचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह असल्याचा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.मुंबईची भाषा मराठीच आहे. सत्ताधाऱ्यांनी या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार