निवडणुकांचा माहोल सध्या तापलेला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. अशातच महाविकास आघाडीची सभा आज १७ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या बीकेसी येथील फटाका मैदान येथे घेण्यात आली. ‘बदल घडणार महाराष्ट्र जिंकणार’ या टॅगलाईन अंतर्गत महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र उगारले.
अमित शाहांनी केसाला ब्राह्मी तेल लावावं म्हणजे केसही येतील आणि स्मरणशक्तीही वाढेल अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. भाजपकडून रात्रीच्या बैठका सुरु आहेत. आपल्यावर नजर ठेवायला गुजरातमधून माणसं आणली आहेत. म्ह्णूनच सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलेल हे लक्षात ठेवा, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मी सीएम असताना कुणाला असुरक्षित वाटलं नाही. मग मोदी असून असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण मुंबई बिल्डरांना देण्याचं षडयंत्र सुरु आहे. केंद्र सरकारला मुंबईचं महत्व मारून टाकायचं आहे. त्यात आता काय सुरु आहे, कटेंगे – बटेंगे. ते सोडा आता, मुंबईवर जर घाला घातला तर हम काटेंगे, असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला. मुंबई तोडण्याचा अपप्रचार नाही, आपल्या विरोधकांना मुंबई तोडायची आहे. नीती आयोगाला मुंबईचं महत्व मारून टाकायचं आहे. मुंबईला तोडणाऱ्याच्या देहाचे तुकडे करणार, असे शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.