आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने झाले असून अद्याप एक आरोपी फरार आहे. आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वधर्मीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले. तिने काही प्रश्न उपस्थित केले आहे. यावेळी तिने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी केली आहे. वैभवी म्हणाली अजितदादा, तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललं आहे, त्याला पाठीशी घालू नका, आम्हाला न्याय द्या अशी मागणी तिने केली आहे.
नेमकं काय म्हणाली वैभवी देशमुख
अजित पवारांना विनंती आहे की माझे वडील गेलेत आम्ही न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे हे राज्य नासत चालले आहे. त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे.
अजित दादांना विनंती करते की या आधीही अनेक प्रकरणे घडली आहेत. त्याची सुद्धा सखोल तपासणी करा. अजितदादा हे असे व्यक्तिमत्व आहे की ते खऱ्याचं खरं करतात, खोट्याचं खोटं करतात. या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा असं वैभवी देशमुख म्हणाली.
खंडणी कुणासाठी मागितली जात होती?
ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती खंडणी नेमकी कुणाला जात होती? त्यामध्ये माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता? सरकारचे डोळे कधी उघडणार? हे सवाल उपस्थित केलेत, दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीनं. तर संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भातले सर्व लेखी पुरावे असून ते लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जाहीर केलं.
बारामतीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीयही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले. वैभवी देशमुख म्हणाली की, एका दलित व्यक्तीला वाचवायला गेले तरी माझ्या वडिलांना अमानुष मारहाण झाली. एखाद्याला मदत करणं गुन्हा आहे का? मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. मला चेहरा बघायला मिळाला नाही. इथून पुढे कधी चेहरा बघायला मिळणार नाही.
आम्हाला जीवे मारतील
वैभवी देशमुख म्हणाली की, बीड जिल्ह्यातील ही घाण आम्हाला उचलून टाकणार आहे. आता आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर रस्त्याने चालताना धक्का लागला तरी हे आम्हाला जीवे मारतील. त्यामुळे न्याय मिळाला पाहिजे. प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us