बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकारात वाल्मिकी कराड यांचं नाव समोर येत आहे. वाल्मिकी कराड यांना याला अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात भीषण परिस्थतीत उद्भवेल, असा इशारा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे. त्यांनी गुरुवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहात मांडला.
नेमकं काय म्हणले संदीप क्षीरसागर
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा सहभाग आहे. मस्साजोग गावातील लोकांनी मला याबाबत माहिती दिली. 6 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर या तीन दिवसांचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तर पूर्ण गणित लक्षात येईल. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाणे जाळून टाकू, असे मस्साजोगचे गावकरी म्हणत होते. मात्र, मी त्यांना थांबवले. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. जिल्ह्यातील लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. सरकारने वेळीच पावलं न उचलल्यास कायदा-सुव्यवस्था सांभाळणे अवघड होऊन जाईल, असे संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहत मांडला.
पुढे ते बोलले, बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येची जी घटना घडली. त्यामध्ये 6,9 आणि 11 डिसेंबर या महत्त्वाच्या तारखा आहेत. 6 तारखेला विंड मिलमध्ये भांडणं झाली. विंड मिल रॅकेटमुळे हा प्रकार घडला. 6 डिसेंबरला भांडणानंतर संतोष देशमुख आणि तिकडचा वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, केवळ एनसी घेतली. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. जेव्हा संतोष देशमुखला दोन गाड्या अडवून उचललं घेऊन गेले, तेव्हा त्यांच्यासोबत एक सहकारी होता. तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने सरपंचांचा जीव धोक्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलिसांनी काहीच केलं नाही. दोन-तीन तासांनी संतोष देशमुख यांचा मर्डर केल्यावर पोलीस कामाला लागले, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.
बीड जिल्ह्यात सध्याच्या घडीला वाळू, मटका आणि दारु अशा अवैध धंद्यांची भरमार आहे. जिल्ह्यात 307 चा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो. सरकारने ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत. बीड जिल्ह्यात मराठा आणि वंजारी हे दोन मोठे समजात आहेत. पण आज जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की, दुकानदारांकडून साधी वस्तू विकत घेताना जात पाहिली जाते. एखादा अधिकारी जिल्ह्यात आला तर त्याच्या नावापेक्षा आडनाव पाहिले जाते. एखाद्या शाळेत मराठा समाजाची जास्त मुलं असतील तर वंजारी विद्यार्थ्याचे पालक त्या शाळेतून आपल्या मुलाचे अॅडमिशन काढून घेत आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. माझ्या जातीच लोक जिल्ह्यात सुईच्या टोकावर मोजण्याइतके आहेत. तरीही बीडने मला दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली आहे, असे देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.
हे ही वाचा:
छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल
अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक