पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेच्या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बस मध्ये नेलं आणि अत्याचार केला. ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे तर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणे खूप गरजेचे असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले.
शासकीय यंत्रणा, चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. मात्र, दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला. पोलिसांनी ८ तपास पथक तयार केली आहेत, आठ तपास पथक या सगळ्याचा कालपासून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल. मात्र, माझं आवाहन आहे की तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आपण सतर्क रहावे. आता या प्रकरणात या पीडित मुलीचे समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
आरोपीवर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जात आहे. तर २४ तास येथून बसेस जात असतात. दरम्यान, बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही? हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा: