राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळयाला उपस्थिती लावल्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देण्यात आला होता. यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर निशाणा धरला आहे. शरद पवार यांनी पुरस्कार सोहळयाला जायला नको होते, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. त्यावर संजय राऊत यांनी आज १४ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया व्यक्त करता नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवारांवर नाराजी का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारला असता संजय राऊत म्हणाले,” अजिबात नाराजी नाही, पवार यांच्याविषयी नाराजी असण्याचे कारण काय? आम्ही आमची भूमिका मांडतो. महाराष्ट्रात ज्यांना गद्दार म्हणून संबोधले जात आहे, ज्यांनी सरकार पाडलं, त्याचा सत्कार शरद पवार यांच्या हातून करणं हा शरद पवार यांचा अपमान आहे. हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे. हा पुरस्कार सरकारी नसून पुण्यातील एका खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार आहे. जे माझ्यावरती टीका करत आहेत त्यांना माझे आणि शरद पवार यांचे संबंध माहीत नाहीत. ते आमचे पिता समान आहेत. शिंदे गटाचे लोक तोंडाची डबडी वाजवत होते, मी टीका केली नाही तर मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. हे त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणातील धडे घ्यावे.”
“अमित शहा, मोदी महाराष्ट्रात येतात आणि शरद पवार यांच्यावर टीका करतात तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली नाही? दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, उदय सामंत, नरेंद्र मोदी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणतात, बरच काही बोलतात तेव्हा यांच्या तोंडाला बूच बसला होता का? किती घाणेरड्या शब्दात टीका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते? आम्हाला हे मान्य नाही, एका गद्दाराला ज्याने शरद पवार यांचाही पक्ष फोडला, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं. मी जे भूमिका मांडली ती शरद पवार यांची देखील भूमिका असायला पाहिजे. शरद पवार यांनी तिकडे जाणं हे महाराष्ट्राला रुचलं नाही, त्यांच्या पक्षातल्या लोकांना देखील रुचलं नाही”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी विरोधकांवर केला.