राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणाचा ६० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असूनही यावर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र अपयशी ठरले. एरव्ही विरोधकांना कात्रजचा घाट दाखवण्याची भाषा करणारे शरद पवार त्यांनीच निर्माण केलेल्या महाविकास आघाडीला वाचवण्यात अपयशी ठरले. काकांच्या तालमीत तयार झालेल्या पुतण्याने शरद पवारांना मात्र दहा जागांवर समाधान मानावं लागलं.
पवारांना आलेल्या अपयशाचे पहिलं कारण म्हणजे नकारात्मक प्रचारावर दिलेला भर. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रमाची योजना आखावी लागते. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेमका याच गोष्टीचा अभाव होता. महायुतीच्या नेत्यांवर शेरेबाजी करत त्यांच्याच क्रियेला प्रतिक्रिया देण्याचं काम शरद पवार आणि त्यांचा गट करत होता. पंतप्रधान मोदींच्या कामावर टीका करण्यातच त्यांचा बहुतांश वेळ वाया गेला. लोकांच्या नेमक्या समस्या काय?त्यांचं समाधान कसं होईल? या महत्त्वाच्या गोष्टींना बगल देत राजकारणाच्या आरोप-प्रत्यारोपात शरद पवार अडकले. पवारांना आलेल्या अपयशाचे दुसरं कारण म्हणजे महायुतीच्या आकलनाचा अभाव. अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले आणि महायुतीची शक्ती द्विगुणीत झाली. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय असो किंवा लाडकी बहीण सारखी योजना, निव्वळ प्रचाराच्या जोरावर नाही तर प्रत्यक्षात लोकांसाठी केलेल्या कामांमुळे महायुतीचा सर्वत्र डंका वाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. लोकांसाठी काम करणारं, लोकांचे सरकार सत्तेवर आले आहे याची जनतेला खात्री पटली. राजकारण आणि निवडणुकीच्या रिंगणात हीच लोकप्रियता पवारांना हेरता आली नाही.
पवारांना आलेल्या अपयशाचे तिसरं कारण म्हणजे धर्मविरोधी लोकांची संगती. संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव या पत्रकाराने हिंदू देवी देवतांबद्दल प्रक्षोभक विधानं केली. सदर प्रकरणाबद्दल आक्रोश व्यक्त केला गेला आणि नंतर महाराव यांनी माफीसुद्धा मागितली. महाराज ज्या व्यासपीठावर ही विधान करीत होते, त्याच व्यासपीठावर शरद पवार सुद्धा उपस्थित होते. शरद पवार यांना ही विधान मान्य होती का? हा प्रश्न लोकांनी विचारायला सुरुवात केली. धर्मविरोधी वक्तव्य करणारे, त्याच सोबत समाजाच्या एकतेला सुरुंग लावणाऱ्या लोकांना पवारांचा छुपा पाठिंबा असतो का, हा प्रश्न लोकांना पडला. पवारांना आलेल्या अपयशाचं चौथं कारण म्हणजे त्यांची फसलेली इकोसिस्टीम. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांची जोडगोळी ही कायम शरद पवार यांच्या राजकारणाचे कौतुक कसं करत असते हा एक संशोधनाचाच विषय आहे. निर्भय बनो या नावाखाली सुरू केलेली चळवळ लोकसभेच्या वेळेला पवारांच्या आणि माविआच्या पाठीशी उभी राहिली, परंतु विधानसभेला त्यांना तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच निर्भय बनूकडे पाठ फिरवली. लोकांचं मत बदलण्यात ही इकोसिस्टम अपयशी ठरली दुसऱ्या बाजूला सज्जाद नोमानी या मौलवीने एका बाजूला वोट जिहादची घोषणा केली आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांना आपला सेनापती म्हणून घोषित केलं. नोमानी हा कुणाचा माणूस आहे? त्याचा बोलवता धनी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. अहिल्या नगरच्या दौऱ्यावर असताना तिथल्या मुस्लिमांच्या एका शिष्ट मंडळाने जिल्ह्याचं नाव पुन्हा अहमदनगर करण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या समोर ठेवला. निवडून आल्यास हा प्रस्ताव मान्य केला जाईल असं त्यावेळेस पवार म्हणाले. नामांतराला विरोध करण्याचा हा प्रकार पवारांना चांगलाच नडला.
पवारांच्या अपयशाचं पाचवं कारण म्हणजे निष्प्रभ झालेलं जरांगे फॅक्टर. मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केलं तेव्हा महायुतीला याचा फटका बसेल की काय असा प्रश्न विचारला गेला. परंतु काळाच्या ओघात मराठवाड्यातील चित्र बदललं. मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडीकडे कुठलीही योजना नव्हती. महायुतीच्या नेत्यांच्या विजयासाठी जातीवादाच्या भिंती तोडून संघटित मतदान केलं गेलं. जातीपातीचा राजकारण करून सत्ता हस्तगत करणाऱ्यांचे मनसुबे मराठवाड्यातील मतदारांनी हाणून पाडले. मराठवाडा ही शरद पवारांसाठी प्रयोग भूमी असल्याचं बोललं जात होतं. या वेळेस मात्र पवारांचे प्रयोग फळाला आले नाहीत असंच आता म्हणावं लागेल. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला आणि महाविकास आघाडीला विश्रांती घ्यायला सांगितली. दुभंगलेल्या आघाडीला आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे स्पष्टच आहे. जातीवादाचं राजकारण करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा उद्देश बऱ्याच लोकांनी केला होता पण महाराष्ट्राच्या जनतेने वेळोवेळी अशा लोकांना पराभवाची धूळ चारलीये.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?
शिंदे गटातील ‘या’ ४ नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध, Eknath Shinde काय भूमिका घेणार?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.