बीड जिल्ह्यात आज बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री आजीत पवार सकाळी सात वाजताच परळीत दाखल झाले. यानंतर अजितदादांनी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यानंतर अजित पवार हे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पोहोचले. या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत अजित पवार यांच्यासोबत उजव्या बाजूला दोन मंत्री म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बसले होते. त्यांच्या बाजूला खासदार रजनी पाटील आणि बजरंग सोनवणे हे बसले होते. तर समोरच्या बाजूला सगळे आमदार म्हणजे सुरेश धस, त्यानंतर नमिता मुंदडा, त्यासोबतच विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके समोर बसल्याचे आपल्याला दिसत होते. अजित पवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान आवास योजनेची माहिती घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी जिल्ह्यातील चुकीच्या कामाची चौकशी होणार, असे सांगितले. तसेच नियोजन आराखड्याबाहेरची आतिरिक्त कामांना आतिरिक्त कामे कशी काय मंजूर केली, असा सवाल अजितदादांनी अधिकाऱ्यांना विचारला. यापुढे जिल्ह्यातील विकासकामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री धनंजय मुंडे यांचा आजचा मुक्काम भगवानगडावर
बीड मधील जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवानगडावर आज मुक्कामी जाणार आहेत. धनंजय मुंडे सध्या वेगवेगळ्या आरोपांच्या वावटळीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अभिमन्यू नव्हे तर अर्जुन आहोत, असे विधान करत कोंडी फोडली होती. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज त्यांचे उर्जास्थान असलेल्या भगवानगडावर मुक्कामी जात आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुंडे अहिल्यानगर जिल्हयात जात असून तेथून ते भगवानगडावर मुक्काम करतील. उद्या सकाळी ते भगवानगडावरुन परळीत परतणार असून दोन दिवस परळीत राहणार आहेत.
अजित पवारांचं ट्विट
जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडून एक ट्विट करण्यात आली. आज बीड जिल्हा समितीची बैठक पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा पातळीवरील नागरी समस्या, सुरक्षा यांसारख्या विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडाव्यात, असं या निमित्ताने स्पष्ट केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा :