आमदारांनी मंत्रिपदाची शपत घेतली असून मंत्री आपापल्या खात्याचा काम सुरु केले आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून खलबत सुरु आहे. आता महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात.
सात राज्यातील भाजपा अध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरु आहे. त्यात महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा फैसला दरवेळी पुढे ढकलण्यात येत आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणूक, विविध राज्यातील निवडणुका, या प्रत्येकवेळी जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ पुढे ढकलण्यात आला. त्यांचा उत्तराधिकारी अजून मिळालेला नाही आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर, गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे भाजपा मोठा धोरणात्मक बदल करणार आहे की त्याच व्यक्तींना या पदावर ठेवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाबहुमताने भाजपा सरकार सत्तेत आले आहे. भाजपाचे प्रदेश महाअधिवेशन येत्या रविवारी , 12 जानेवारी रोजी शिर्डी होत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करतील. नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री पदाचा कारभार आहे. सात महिन्यांपासून ते मंत्रीपदासह भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत. बावनकुळे यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ही जबाबदारी त्यांच्यावर कायम असावी, असे वरिष्ठ नेत्यांची भावना असल्याचे समोर येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संघटनात्मक घडी विस्कटू नये याची खबरदारी भाजपा घेत असल्याचे कळते. या निवडणुकीपूर्वी कोणताही संघटनात्मक मोठा बदल न करण्याचे धोरण भाजपाने घेतले आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीसह भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा बजावावी लागण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटना, कार्यकर्त्यांशी संवाद, संघासोबतचे ट्युनिंग आणि त्यांच्या कोपरा बैठक, मायक्रो प्लॅनिंगसोबत चांगला ताळमेळ बसल्याने पक्षाला अभूतपूर्व असे यश मिळाले. बावनकुळे यांनी आता सदस्य वाढविण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांना या पदावर कायम ठेवण्यात येईल असे चित्र आहे. तर भाजपा काही महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता बघता संघटनात्मक घडी विस्कटू न देण्याचे भाजपाचे धोरण समोर येत आहे.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो