शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. यातील पीडित २६ वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी (Pune Crime) आणि महिलांवरील अत्याचारांचा घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे. पीडित तरुणीला अनोळखी आरोपीने एसटी बस अन्यत्र थांबल्याचं खोटं सांगितलं, त्यानंतर तिला बसमध्ये नेऊन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा आरोप आहे. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
पुण्यातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या, २४ तास कार्यरत असलेल्या स्वारगेट बस डेपो येथे एका भगिनीवर अत्याचार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. आपल्या माता भगिनी या साक्षात जगदंबेचं रूप आहेत असं आपण मानतो. या जगदंबेच्या मूर्तीची यथासांग पूजा करत असताना आपण आपल्या माता भगिनींच्या सुरक्षेत का कमी पडतो? वारकऱ्यांवर लाटीचार्ज करणारं आपलं गृहखातं राज्यातील महिलांना सुरक्षित ठेवण्यात का नापास ठरतं? या प्रश्नांची उत्तरं आता हवी आहेत… निषेध, निंदा, आश्वासन नको… आता महाराष्ट्राला उत्तर हवं आहे!
गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जात आहे. तर २४ तास येथून बसेस जात असतात. दरम्यान, बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही? हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
BMC मध्ये 1846 कार्यकारी सहायक’ पदांसाठीचा निकाल जाहीर; ‘या’ संकेतस्थळावर पहा निकाल