२०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अशातच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती आणि जयकुमार गोरे यांच्यावर संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेला आरोप हे सध्या चर्चेचे विषय बनले आहेत. त्यातच आज विधानभवन बाहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरला का वाचवतंय? ते या सरकारचे जावई आहेत का? असा सवाल त्यांनी केला. नेहरू काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले हे सोडा, कोरटकर आणि सोलापूरकर वर काय कारवाई करणार? हे सांगा. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर अशी कुठली अवलाद आहे. त्याला वाचवण्यासाठी सरकार झुकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर वर काहीच कारवाई करणार नाही का? असा सवाल करत आव्हाडांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
राहुल सोलापूरकर काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आई त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचीसुद्धा पुरावे आहेत असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. तसेच तसेच औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिली होती. मोहसीन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण आहे. लोकांना गोष्टी रूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता अली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असं एका मुलाखती दरम्यान राहुल सोलापूरकर म्हणाले.
इंद्रजित सावंत काय म्हणाले?
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. यामध्ये त्यांनी ब्राम्हण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करत पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली होती. याबाबत सावंत यांनी फोनवरून झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला होता. ज्यामध्ये जिथं असाल तिथे येऊन ब्राम्हणाची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची धमकी दिली आहे.