डोंबिवलीच्या गीतिशाने अवघ्या ९ व्या वर्षी समुद्राची सफर पार केली आहे. एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १२ किमीचे अंतर गीतिशाने ३ तास ४३ मिनिटांत पोहून पूर्ण केले आहे. समुद्रात पोहतांना येणाऱ्या लाटांचा अडथळा तसेच तेलाचे तवंग असलेले पाणी पोटात जात असूनही मेहनत आणि जिद्दीच्या बळावर गीतिशाने बाजी मारली आहे. या कामगिरीमुळे तिचे कौतुक केले जात आहे.
गीतिशा प्रवीण भंडारे ही डोंबिवलीतील रॉयल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेमध्ये शिकत आहे. तिचे प्रशिक्षण डोंबिवली शहरातील यश जिमखाना येथील जलतरण प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे सुरु आहे. प्रशिक्षण सुरु असतांना गीतिशाला समुद्रात पोहण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच तिने समुद्र भरारी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गीतिशाने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया असे १२ किलोमीटर अंतर पोहण्यासाठीचा सराव सुरू केला. यश जिमखाना येथे ती दररोज तीन ते चार तास प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती. गीतिशाने महिन्यातून दोन वेळा उरण येथे संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव सुरू केला होता. त्यानंतर एलिफंटा येथून शनिवारी म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजून आठ मिनिटांनी अंगाला ग्रीस लावून समुद्राला वंदन करून अथांग पसरलेल्या अरबी समुद्रात गेटवे ऑफ इंडियाकडे तिने भरारी घेतली.
पोहण्याचे सातत्य राखून गीतिशाने गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवास सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी पूर्ण केला. यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक नीलकांत आखाडे यांनी गीतिशाने बारा किमीचे अंतर ३ तास ४३ मिनिटांत पार केल्याचे सांगितले. या गोष्टीमुळे गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचल्यावर प्रशिक्षक व उपस्थितांकडून गीतिशाचे स्वागत करण्यात आले. ९ वर्षाच्या गीतिशाने पहाटेचा गार वारा, पाण्यावर पसरलेला तेलाचा तवंग, पोटात जाणारे खारे पाणी तसेच मोठ्या जहाजांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांवर स्वार होत मोठ्या जिद्दीने गेटवे ऑफ इंडियाकडची स्वारी कायम ठेवली, आणि म्हणूनच ही समुद्रभरारी घेण्यात ती यशस्वी ठरली.
हे ही वाचा:
IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान
प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट