प्रयागराज मध्ये महाकुंभमेळावा सुरु आहे. या महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. संगम घाटावर अमृतस्नानाकरिता जाण्याची भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्नानासाठी ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत असताना ही दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सर्व १३ आखाड्यांनी आज होणारं अमृतस्नान रद्द केल्याची माहिती आहे. ही घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. आता माजी केंद्रीय मंत्री आणि निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर साध्वी निरंजन ज्योती यांनी मोठं वक्तव्य केला आहे. सरकारकडे त्यांनी या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाल्या साध्वी निरंजन ज्योती
आखाड्यानं या दु:खद घटनेनंतर अमृतस्नान न करण्याचा निर्णय घेतल्याचं साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितलं. या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त करत सरकारकडे या घटनेच्या चौकशीची मागणी केली. याशिवाय या प्रकरणात साध्वी निरंजन ज्योती यांनी विरोधी पक्षांना इशारा दिला आहे. विरोधकांनी यावर राजकारण करु नये, असं साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या.
साध्वी निरंजन ज्योती पुढं म्हणाल्या की ही दु:खद घटना आहे. या घटनेवर कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये. या प्रकरणात आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणा समोर आलेला नाही. आतापर्यंत 5 कोटी लोकांनी सुरक्षितपणे स्नान केल्याचं साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या. महंत राजूदास यांनी प्रशासनासोबत आघाड्यांची बैठक सुरु असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमेळ्यातील या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती घेत मदत कार्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, आनंद आखाड्यात 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. आनंद आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी जी यांनी आखाड्यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी अमृतस्नान न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
हे ही वाचा :