उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री १ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे.
प्रयागराज जंक्शनवर रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि पोलिस दलाची तैनाती वाढवण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मौनी अमावस्या स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना संगमापर्यंत सुरक्षितपणे नेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयागराज जंक्शनबद्दल सांगायचे तर, येथे प्रशासन गेट क्रमांक 3 आणि 4 मधून भाविकांना प्रवेश देत आहे, तर त्यांना गेट क्रमांक 6 मधून बाहेर काढून स्नानासाठी पाठवले जात आहे. येथे भाविकांची गर्दी सातत्याने वाढत आहे. रेल्वे स्थानकाबाहेर भाविकांची मोठी गर्दी झाली असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस माईकद्वारे सातत्याने सूचना देत आहेत. रेल्वे स्थानक आणि कुंभ परिसरात सुरक्षा दलांची दक्षता वाढवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळता यावा यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या गेटवर तैनात करण्यात आले आहेत. दुर्घटनेनंतरही भाविकांच्या श्रद्धेमध्ये कोणतीही घट झाली नसून, संगमात पवित्र स्नान करण्यासाठी ते सातत्याने पुढे जात आहेत.
कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलिस, आरएएफ आणि इतर सुरक्षा दल तैनात आहेत. भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे निश्चित करण्यात आले आहेत. माईकवरून सतत घोषणा करून भाविकांना सूचना दिल्या जात आहेत. स्टेशन आणि संगम परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी भाविकांनी संयम राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे
हे ही वाचा :