उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री 1 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज महाकुंभातील चेंगराचेंगरीवर सतत लक्ष ठेवून आहेत . त्यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पीएम मोदींनी यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्याकडून महाकुंभमेळ्याच्या परिस्थितीची माहिती घेतली आणि जखमींसाठी आतापर्यंत केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच पंतप्रधानांनी भाविकांना तातडीने मदत देण्यासही सांगितले आहे. मौनी अमावस्येला अमृतस्नान करण्यापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे . त्यांनी यूपी सरकारला केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
मौनी अमावस्येला कोट्यवधी भाविक महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचले होते आणि संगम नाक्यावर स्नानासाठी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यूपी सरकारचा हवाला देत महाकुंभ मेळा परिसरात आणखी काही महिला गुदमरल्यामुळे बेशुद्ध झाल्या आणि पडल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती बिघडताच, तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावण्यात आल्या आणि 25 ते 30 जणांना महाकुंभमध्ये बांधलेल्या सेंट्रल हॉस्पिटलसह प्रयागराजच्या इतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी सुरक्षा दलांनी तातडीने ग्रीन कॉरिडॉर तयार केला. त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम रुग्णालयात आहे. याशिवाय गरज भासल्यास जखमींना एअर ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्याची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे.
हे ही वाचा :