spot_img
Saturday, February 8, 2025

Latest Posts

आजपासून महाकुंभ २०२५ चा शुभारंभ; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले….

आजपासून महाकुंभ २०२५ चा शुभारंभ होत आहे. पुढील ४५ दिवस हा महाकुंभ मेळावा प्रयागराजमध्ये सुरु असणार आहे. या मेळाव्यात ३० कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

आजपासून महाकुंभ २०२५ चा शुभारंभ होत आहे. पुढील ४५ दिवस हा महाकुंभ मेळावा प्रयागराजमध्ये सुरु असणार आहे. या मेळाव्यात ३० कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ होणार असून पहिलं शाही स्नान आज पार पडणार आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ५० लाख भाविक गंगेत स्नान करणार आहेत.

जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणजेच प्रयागराज येथील संगमच्या काठावर आयोजित महाकुंभाची सुरुवात सोमवारी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या मोठ्या स्नान विधीने झाली. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर होणाऱ्या या श्रद्धेच्या महान सोहळ्यात येत्या ४५ दिवसांत अध्यात्माचे अनेक रंग रंगणार आहेत. तब्बल १२ वर्षांनंतर या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. संतांचा असा दावा आहे की या घटनेसाठी खगोलीय बदल आणि संयोग १४४ वर्षांनंतर होत आहेत, ज्यामुळे हा सोहळा अधिक शुभ झाला आहे. कदाचित त्यामुळेच यावेळी ३५ कोटी भाविक महाकुंभाला येतील असा विश्वास उत्तर प्रदेश सरकारला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व भाविक, संत, महात्मा, कल्पवासींचे स्वागत केले आणि महाकुंभाच्या पहिल्या स्नानासाठी शुभेच्छा दिल्या. महाकुंभ हा भारताच्या कालातीत अध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे, विश्वास आणि सौहार्दाचा उत्सव आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरुन पोस्ट करत महाकुंभासाठी आलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या करोडो लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे! महाकुंभ २०२५ ची सुरुवात प्रयागराजमध्ये होत आहे, जी श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमावर असंख्य लोकांना एकत्र आणेल. महाकुंभ हा भारताच्या कालातीत अध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे आणि विश्वास आणि सौहार्दाचा उत्सव आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

“पौष पौर्णिमेला पवित्र स्नान करून प्रयागराज या पवित्र ठिकाणी आजपासून महाकुंभाला सुरुवात झाली आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी, मी सर्व भक्तांना मनापासून नमस्कार आणि अभिनंदन करतो. भारतीय अध्यात्मिक परंपरेचा हा भव्य सण तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारेल अशी आमची इच्छा आहे,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Latest Posts

Don't Miss