Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री 1 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज महाकुंभातील चेंगराचेंगरीवर सतत लक्ष ठेवून आहेत . त्यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पीएम मोदींनी यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्याकडून महाकुंभमेळ्याच्या परिस्थितीची माहिती घेतली आणि जखमींसाठी आतापर्यंत केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच पंतप्रधानांनी भाविकांना तातडीने मदत देण्यासही सांगितले आहे. मौनी अमावस्येला अमृतस्नान करण्यापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे . त्यांनी यूपी सरकारला केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अनेक मृतदेह प्रयागराज मेडिकल कॉलेजच्या शवागारात नेण्यात आले आहेत. मौनी अमावस्येला आंघोळीसाठी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संगमावर बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. प्रचंड गर्दीमुळे संरक्षण आणि निमलष्करी दलाचे जवान बॅरिकेड्स लावून गर्दी नियंत्रित करण्यात व्यस्त आहेत.
मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराज महाकुंभात स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आखाड्यांनी अमृत स्नान कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता आज एकही आखाडा अमृतस्नान घेणार नाही आणि सर्व आखाड्यांनीही आपल्या मिरवणुका छावण्यांमध्ये परत बोलावल्या आहेत.