मध्य प्रदेशातील हरपालपूरमध्ये झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी ट्रेनवर दगडफेक तर केलीच पण तोडफोडही केली. ही गाडी महाकुंभासाठी जात होती. उद्या मौनी अमावस्येमुळे विविध ठिकाणांहून लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना झाशी विभागातील हरपालपूर स्टेशनवर रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. येथे जमावाने अचानक ट्रेनवर हल्ला केल्याने ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या हल्ल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गर्दीतील लोक रेल्वेच्या बोगीवर दगडफेक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. असे सांगितले जात आहे की, जमाव ट्रेनमध्ये आत जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु लोकांना आत प्रवेश करता आला नाही तेव्हा त्यांनी गेट आणि खिडक्या तोडल्या. या घटनेनंतर तात्काळ स्थानिक पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली असून अनेक गाड्यांना उशीर झाला. छतरपूर सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे प्रभारी वाल्मिक चौबे यांनी सांगितले की, रात्री एक वाजण्याच्या सुमारास छतरपूर रेल्वे स्थानकावर फाटक न उघडल्याने काही लोकांनी दगडफेक करून रेल्वेची तोडफोड केली.
माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो, ट्रेन छतरपूरहून प्रयागराज कुंभला जात होती, सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. हरपालपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पुष्पक शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांच्या टीमने सल्ला दिल्यानंतर ट्रेन पाठवली, खजुराहो आणि छतरपूरमध्येही लोकांनी उपद्रव निर्माण केला आहे. महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश प्रशासनाने संपूर्ण प्रयागराजमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. कुंभ शहरात ठिकठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता