भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं आज २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री ९.४१ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवार (२८ डिसेंबर) दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, रामदास आठवले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह संपूर्ण गांधी कुटुंब उपस्थित होते. त्यासोबत अनेक राजकीय नेत्यांनी यावेळी हजेरी लावली. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काल दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते. यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. यावेळीही अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर काँग्रेस मुख्यालयापासून दिल्लीतील निगम बोध घाटाकडे त्यांचे पार्थिव रवाना झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिन्ही दलाकडून त्यांना सलामी देण्यात आली.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी एका विशिष्ट प्रोटोकॉलचेही पालन करण्यात आले. डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवण्यात आला होता. त्यासोबतच अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. यानंतर या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी उपस्थितीत असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. १९४७ साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. सन १९६६ ते १९६९ या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. यानंतर ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. १९७२ ते १९७६ या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.१९८२ ते १९८५ या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर १९८५ ते १९८७ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. सन १९९१ सालाच्या आर्थिक संकटकाळी मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. सन १९९६ साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. २००४ साली यूपीएची सत्ता आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल २०२४ साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका