World Day Of Social Justice : जागतिक सामाजिक न्याय दिन (World Day of Social Justice) हा दिवस प्रत्येक वर्षी २० फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश समाजातील सर्व व्यक्तींना समान संधी, हक्क आणि न्याय मिळवून देणे आहे. या दिवशी, जागतिक पातळीवर सामाजिक विषमता, गरिबी, बेरोजगारी आणि असमानता यावर चर्चा केली जाते तसेच या समस्यांच्या निराकरणासाठी उपाय शोधले जातात. मानवी हक्क आणि जगात पसरलेली असमानता यांच्यामध्ये समाजातील संधी आणि विशेषाधिकारांच्या वितरणात न्याय प्रस्थापित करणे, हे सामाजिक न्यायाच्या कक्षेत येत असल्याने लोकांना सामाजिक न्यायाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी ‘जागतिक सामाजिक न्याय दिन’ साजरा केला जातो.
- जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्यामागचे मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- समाजातील विविध गटांमधील विषमता कमी करणे जसे की जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर भेदभाव कमी करणे.
- गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक असमानतेला विरोध करणे आणि त्यावर उपाय शोधणे.
- मानवाधिकारांचे संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्क मिळवून देणे आणि त्यांचे संरक्षण करणे.
- सामाजिक न्यायाच्या महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्याबाबतचे शिक्षण देणे.
- समाजात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे. या दिवसाचा उद्देश विविध समाजातील घटकांना एकत्र आणून समृद्ध आणि समतावादी समाज निर्माण करणे आहे.
कधीपासून साजरा केला जातो ‘हा’ दिवस :
२६ नोव्हेंबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जाहीर केले की, दरवर्षी २० फेब्रुवारी हा ‘जागतिक सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जाईल. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या समस्येचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने या दिवसाची सुरुवात केली. समतेचा प्रसार करताना अन्याय आणि भेदभाव नष्ट करणे, हा त्याचा उद्देश आहे.