मराठवाड्यातील पावसाची (Marathwada Rain) परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या (Aurangabad) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील परिस्थिती पाहता सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. पण त्याच धनंजय मुंडेंनी रविवारी (२७ ऑगस्ट) बीड (BEED) जिल्ह्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुफान जल्लोष पाहायला मिळाला.
राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) बीडमध्ये सभा घेतली. त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी रविवारी अजित पवारांची (Ajit Pawar) देखील बीडमध्ये सभा झाली. या सभेतून अजित पवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सभेच्या ठिकाणी मोठमोठे होर्डिंग, फुलांची सजावट, मोठमोठ्या कमानी, क्रेनला लावलेला भला मोठा हार, नेत्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी, ठिकठिकाणी अजित पवारांच्या ताफ्यावर फुलांची उधळण हे सर्व काही चित्र अजित पवार गटाच्या कार्यक्रमात पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हा कार्यक्रम ज्या जिल्ह्यात झाला, त्याच बीड जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीच्या सुरुवातीस विभागाच्या वतीने धनंजय मुंडे यांचे सर्वच मंत्रिमहोदयांचा सत्कार स्वागत करण्यात येणार होता. मात्र, दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आता स्वागत करण्याऐवजी जबाबदारीने कामावर भर द्यावा असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. पण त्याच धनंजय मुंडेंना दोन दिवसानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विसर पडला की काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
बीडची सभा विकासाची सभा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात असला तरीही, शरद पवारांच्या सभेनंतरची ही उत्तर सभा होती अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे या सभेतून शरद पवारांवर अनेक नेत्यांनी टीका करत उत्तर देखील दिले. पण या सभेसाठी करण्यात आलेली भव्यदिव्य तयारी या सभेतील चर्चेचा विषय ठरला. अजित पवारांच्या रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. फुलांची उधळण, मोठमोठ्या क्रेनच्या माध्यमातून भला मोठा हार स्वागतासाठी लावण्यात आला होता. तसेच सभेच्या ठिकाणी मशीनमधून जोरदार आतषबाजी करण्यात आली. सोबतच फटाक्यांची आतषबाजी देखील पाहायला मिळाली. त्यामुळे या जोरदार जल्लोषामुळे सभा चांगलीच गाजली.
हे ही वाचा:
अभिनेते किशोर कदम यांनी शेअर केला मुंबई पुणे हायवेवरील अनुभव
पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण आहेत? अजित पवार की चंद्रकांत पाटील…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.