अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पाकडे या अर्थसंकल्पातून आयकरात किती सूट मिळणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्योजक, व्यावसायिकांपासून सर्वांना उत्सुकता होती. आयकरसंदर्भात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेचं बजेट काय असणार, प्रवाशांना काय सुविधा, सवलती मिळणार याकडे देखील देशाचे लक्ष लागले होते. त्यानुसार, अर्थमंत्र्यांनी रेल्वेचा अर्थसंकल्प देखील सादर केला. त्यामध्ये, नव्या रेल्वेगाड्या, बोगी, दुपदरीकरण, मेट्रो आणि वंदे भारत ट्रेनसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून रेल्वेचं बजेट स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होतं. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षात रेल्वे बजेटही नियमित बजेटमधून सादर केले जात आहे. त्यानुसार, आज अर्थमंत्र्यांनी रेल्वे बजेटही त्यातच सादर केले.
मोदी सरकारच्या काळात रेल्वेचं नवं जाळ निर्माण करताना रेल्वे प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. त्यातच, वंदे भारत एक्स्प्रेस, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन, महानगरातील मेट्रो प्रकल्पना अधिक गतिमान करण्यात आल्याचं पाहायला मिळाला. त्यात, आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तब्बल 1 लाख 38 हजार 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 6640 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरतूद
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या वार्षिक 2025 च्या बजेटमध्ये रेल्वे मंत्रालयासाठी 1 लाख 38 हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वेगाड्या,बोगींसाठी 45 हजार 530 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नव्या रेल्वेमार्गांसाठी 32 हजार 235 कोटींची तरदूत करण्यात आली
रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणासाठी 32 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
रेल्वेचे गेज बदलण्यासाठी 4 हजार 550 कोटी, रेल्वे सेवा,यार्ड आधुनिकीकरण व इतर कामांसाठी 8 हजार 601 कोटी तरतूद केली आहे.
रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणासाठी 22 हजार 800 कोटी, रेल्वे सिग्नल आणि टेलिकॉमसाठी 6 हजार 800 कोटींची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे.
रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणासाठी 6 हजार 150 कोटी
रेल्वे पूल, बोगदे व अन्य बांधकामांसाठी 2 हजार 169 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
एकूण रेल्वे बजेटसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून 1 लाख 38 हजार 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी 6640 कोटींची तरतूद
देशाच्या बजेटमधून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठीही भरगोस निधी मिळाला आहे. त्यानुसार, पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे– प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, तर मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख रुपयांची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तब्बल 6640 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आल्याचं दिसून आलं.
हे ही वाचा :
केंद्रीय अर्थसंकल्पाचा बजेट तुम्हाला कधी आणि कुठे पाहायला मिळणार