सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला विषय म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणाच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे आणि संशयित वाल्मिक कराड. अशातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना थेट पाठिंबा जाहीर केलाय. तर या प्रकरणात भगवान गड खंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे असं वक्तव्यच नामदेव शास्त्री महाराजांनी केलंय. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करताच संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवानगडावर पोहोचलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधातले सगळे पुरावे त्यांनी नामदेव शास्त्रींच्या समोर ठेवले आणि त्यांची भूमिका काय आहे ती देखील मांडली. यावर नामदेव शास्त्रींनी सहानुभूतीची भूमिका घेत देशमुख कुटुंबाला पाठिंबा देखील दिलाय. असं असताना नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. तसेच या प्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा शास्त्री यांच्या विरोधात वारकरी आघाडीनं राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिलाय.