२०१९ आणि २० साली एक विषाणू आला आणि त्याने संपूर्ण जग बंद पाडलं, दुकाने, शाळा, कॉलेज ते अगदी कंपन्यांना टाळा लागला होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता घराबाहेर पडायलाच नको अशी त्यावेळी प्रत्येकाने मनाशी गाठ बांधली होती. त्या विषाणूचं नाव होतं कोरोना म्हणजेच कोविड १९. ज्यानं अनेकांचा जीव घेतला, अक्षरशः थैमान घातलं, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनानं कुणाला सोडलं नाही. कोरोना झाला असं म्हटलं तरी मनात धडकी भरायची,इतकी भीषण परिस्थिती होती. आता कोरोनाच्या वरचढ असलेला एचएम पीव्ही विषाणू पसरू लागलाय. कोरोना प्रमाणेच एचएम पीव्ही विषाणूची सुरुवातसुद्धा चीनमधून झाली आणि अखेर नाही नाही म्हणता भारतात एचएम पीव्हीचा पहिला रुग्ण सापडला. बेंगलुरू मधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एचएम पीव्हीची लागण झाल्यानं खळबड उडाली आहे. त्यानंतर अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला लागण झाली आहे. एकाच दिवसातील या दोन घटनांमुळं खळबड उडाली आहे. त्याच पाठोपाठ महाराष्ट्रातील नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत.