महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. या मतदानात मतदारांनी जोरदार उत्साह दाखवला. यामुळे मतदानाचा गेल्या ३० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ६५.१ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. राज्यात महायुती (M) आणि महाविकास आघाडी (M) यांच्यात मुख्य लढत आहे. आता यामध्ये कोणता M बाजी मारणार आहे? महिला मतदारांचा फायदा नेमका कोणाला होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील १०० विधानसभा मतदार संघात बंपर मतदान झाले. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून ७६ टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात ८४.७९ टक्के झालं आहे.