भारतातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे. तसेच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. दरवर्षी हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा म्हणून साजरा केला जातो. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुस्तक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काही मान्यवरांच्या आवडीच्या कवितांची मैफल रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेली पैठणी कशी विणतात हे पाहण्याची संधी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.