राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज मतदान पार पडलं. तर नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात तिरंगी लढत आहे. या तिन्ही संघातून जोरदार प्रचार करण्यात आला होता. आज बुधवारी मतदानाच्या दिवशी नांदगावमधील वातावरण तणावग्रस्त पाहायला मिळालं. मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळ यांनी अडवली. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला होता. मतदार बाहेरून आणल्याचे सांगत समीर भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. गाडी पुढे जाऊ देणार नाही असे सांगत समीर भुजबळांनी कार्यकर्त्यांना अडवलं. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात हातापायी झाल्याचेही दिसून आले.